शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची सावर्डे विद्यालयाला भेट

शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचे कौतुक; राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

चिपळूण (प्रतिनिधी) : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी गुरुवारी सायंकाळी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार तथा सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम, सचिव महेश महाडिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या उपस्थितीत मंत्री भुसे यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यालयाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील कामगिरी, SQAAF मधील ‘A+’ दर्जा, विविध शैक्षणिक उपक्रम व स्पर्धा परीक्षांतील यशाची माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील विद्यालयाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दलही मंत्री भुसे यांनी कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावर डॉजबॉलमध्ये प्राची जाधव व सान्वी शिर्के, जलतरणात आरोही पालखडे, ८, ५ व १५ हजार मीटर धावण्यामध्ये सागर शर्मा आणि रायफल शूटिंगमध्ये यश सावंत यांनी मिळविलेल्या यशाची दखल घेण्यात आली. तसेच कबड्डी, मैदानी व तायक्वांदो स्पर्धेत विभागीय स्तरावर यश मिळविणाऱ्या इच्छा राजभर, चिन्मयी शिगवण, अजिंक्य भायजे, आयुष राडे, आर्यन घाणेकर, अथर्व घाणेकर, सार्थक म्हादे, ध्रुव घाणेकर, ओम घाणेकर, गंधर्व धने, पृथ्वी राजभर, श्रवण आग्रे, भावना आंग्रे व पायल भुवड यांचा मंत्री भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देतानाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देऊन शिक्षणाची संधी देणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले. संस्थेला पुन्हा भेट देण्याचे आश्वासन देत त्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.