वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरासह ग्रामीण भागात रविवारी सकाळी ठीक ठिकाणी दुर्गामातेचे ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत व भक्तीमय वातावरणात आगमन झाल्यावर प्रतिष्ठापना करण्यात आली. वेंगुर्ला शहरात मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोली नाका, गाडीअड्डा मित्रमंडळ बाजारपेठ वेंगुर्ला, ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वेंगुर्ला व कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ वेंगुर्ला इत्यादी सार्वजनिक ४ ठिकाणी शहरात दुर्गामातेचे पूजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील शिरोडा, मठ शिवाजी चौक मित्रमंडळ येथे, म्हापण बाजारपेठ आदी भागात दुर्गामातेचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून ९ दिवस विविध रूपात देवीची पूजा, धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तालुक्यातील बहुसंख्य गावामध्ये श्री सातेरी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच नवदुर्गा ठिकाणी दांडिया, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. त्यामुळे आठवडाभर वेंगुर्ला शहर तसेच ग्रामीण भागात चैतन्यमय वातावरण राहणार आहे.













