मराठी लावणीचा ठसका, अभिनयातील सहजता आणि आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह लोककलेच्या क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मधू कांबीकर…हे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती अस्सल लावणीची अदा आणि आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणारी एक गुणी कलावंत!
२८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. लोककलेचा वारसा जपत त्यांनी पुढे मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘शापित’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. त्यानंतर ‘हेच माझं माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘बिनकामाचा नवरा’ आणि ‘माझा छकुला’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. विशेषतः आई, सासू आणि कुटुंबातील विविध व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप उमटवली.
मधू कांबीकर यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून मर्यादित नव्हती. त्या एक समर्थ लावणी कलावंतही होत्या. पारंपरिक लावणीचा इतिहास आणि तिचे सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यांनी ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सादर केला. लावणी ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा आहे, हे त्यांनी आपल्या सादरीकरणातून अधोरेखित केले.
त्यांच्या अभिनयाची दखल विविध पुरस्कारांनीही घेतली. ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१८ मध्ये त्यांना झी चित्र गौरव पुरस्काराचा जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला
मात्र, त्यांच्या आयुष्यात एक कठीण वळण आले ते नोव्हेंबर २०१६ मध्ये. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात लावणी सादर करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. या घटनेनंतर त्यांचा कलाप्रवास पूर्वीसारखा सुरू राहू शकला नाही एकीकडे लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी कलावंत, तर दुसरीकडे पडद्यावर आपल्या अभिनयाने व्यक्तिरेखांना जिवंत करणारी अभिनेत्री… मधू कांबीकर यांनी मराठी मनोरंजनविश्वाला दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
त्यांच्या जाण्याने एका गुणी अभिनेत्रीचा आणि अस्सल लोककलेशी नातं जपणाऱ्या कलावंताचा प्रवास संपला असला, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि लावणीच्या माध्यमातून जपलेली परंपरा रसिकांच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहील.
लावणीचा ठसका, अभिनयाची ताकद आणि लोककलेचा अभिमान जपणाऱ्या मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!












