चिपळूण (प्रतिनिधी) : एसव्हीजेसी क्रीडा संकुल डेरवण येथे दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूण या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी रिद्धी सुनील भालेकर हिने १७ वर्षे वयोगटात तीन किलोमीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सतरा वर्ष वयोगटामध्ये 4×100 रीले या प्रकारामध्ये निधी खापरे, रिद्धी भालेकर, मानवी शिगवण, सांची बुरटे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व खेळाडूंना अरुण शिगवण, विकास चांदे, सौ मृणाल पवार व इतर क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












