दसऱ्यानंतर तीन्ही रेल्वे स्थानकांना भेट देत प्रवाशी संघटना व अधिकाऱ्यांच्या बैठकींचे आयोजन
राजापूर प्रतिनिधी : राजापूर, विलवडे व सौंदळ रेल्वे स्थानकांतील विविध प्रश्न व समस्या तसेच स्थानिक मंडळे, प्रवाशी संघटना व संस्थांच्या असलेल्या मागण्यांची आमदार किरण सामंत यांनी दखल घेतली आहे. याबाबत दसऱ्यानंतर या तीन्ही रेल्वे स्थानकांवर प्रत्यक्ष भेट देताना रेल्वे प्रशासनाचे अधिकारी स्थानिक मंडळे, प्रवाशी संघटना व संस्थां प्रतिनिधी यांची बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. आ. किरण सामंत यांनी या प्रश्नी लक्ष घातल्याने आता या तीन्ही रेल्वे स्थानकांशी संबधित प्रश्न मार्गी लागणार आहेत.
राजापूर तालुक्यात राजापूर व सौंदळ ही दोन रेल्वे स्थानके आहेत, तर राजापूरवासीयांना जवळ असलेले लांजा तालुक्यातील विलवडे हे रेल्वे स्थानक आहे. या तीन्ही रेल्वे स्थानकांतील विविध समस्या, सेवा सुविधांसह काही गाडया थांबविण्याची मागणी असे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. राजापूर स्थानकात जनशताब्दीला थांबा द्यावा अशी मागणी आहे. तर सौंदळ रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेली सीएस्एमटी मडगाव गाडी व अन्य गाडया थांबवाव्यात अशी मागणी आहे. तर विलवडे स्थानकात सर्व एक्सप्रेस गाडयांना थांबा द्यावा अशी मागणी आहे. याबाबत प्रवाशी संघटनांनी रेल्वे प्रशासनाला निवेदनही दिलेले आहेत तर काही संघटनांनी आंदोलनही केलेली आहेत.
याची दखल आता आ. सामंत यांनी घेतली असून त्यांनी याप्रश्नांबाबत दसऱ्यानंतर एकाच दिवशी तीन्ही स्थानकांना भेट देत कोकण रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्या त्या स्थानकांचे प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता या तीन्ही स्थानकांतील विविध प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.












