नानार इंगळवाडी दुर्घटनेतील चौथ्या मुलीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर; हेलिकॉप्टर, ड्रोनसह स्कूबा डायव्हर्सची मदत

जैतापूर: वार्ताहर
राजापूर तालुक्यातील नानार इंगळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार बालकांचा पाण्यात बुडून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौथ्या मुलीचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या दुर्घटनेत तीन निष्पाप मुलांचे मृतदेह हाती आले असून, अद्याप बेपत्ता असलेल्या चौथ्या मुलीचा शोध घेण्यासाठी सर्व स्तरांवरून व्यापक मोहीम राबवली जात आहे. आज चौथ्या दिवशी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी तळ ठोकून होते.

राजापूरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार हे आज दिवसभर घटनास्थळी जातीने उपस्थित राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते. तसेच पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम हेदेखील प्रत्यक्ष उपस्थित राहून शोधमोहिमेचे नियंत्रण करत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचे जवान या कार्यात तैनात करण्यात आले आहेत. शोधकार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आज ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची कसून पाहणी करण्यात आली, तर कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरनेही विस्तीर्ण खाडी परिसरात हवेतून शोध घेतला. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मालवण आणि वेंगुर्ला येथून प्रशिक्षित कायाकिंग पथके तसेच मोठ्या प्रमाणावर स्कूबा डायव्हर्स पाचारण करून खोल पाण्यात मोहीम हाती घेतली जात आहे.

या संकटकाळात शिवसेना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी सातत्याने उपस्थित राहून मदतकार्यात सक्रिय आहेत. तसेच युवा नेत्या अपूर्वा सामंत यादेखील संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, शोधकार्यासाठी शक्य ती सर्व मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वरिष्ठ पातळीवरून अशा प्रकारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आपत्ती व्यवस्थापनातील आवश्यक ती प्रशिक्षित यंत्रणा पहिल्याच दिवशी वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे.

आपल्या कुटुंबातील निष्पाप लेकराचा शोध लवकरात लवकर लागावा आणि तिच्यावर अंतिम विधी करता यावेत, यासाठी कुटुंबीय डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून उर्वरित सर्व त्रुटी दूर करत ही शोधमोहीम तातडीने पूर्ण व्हावी, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.