साखरपा तळवाडीत ६३ ऐवजी १०० KVA चा नवा ट्रान्सफॉर्मर बसवल्याने समाधान

ओंकार कोलते यांच्या प्रयत्नांना यश

साखरपा | वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा तळवाडी, जाधववाडी, सुर्वेवाडी व भडकंबा बेर्डेवाडी परिसरातील नागरिकांची विजेच्या कमी दाबाची (Low Voltage) समस्या अखेर मार्गी लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते ओंकार संजय कोलते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज तळवाडी येथील जुना ६३ KVA चा ट्रान्सफॉर्मर काढून त्याजागी १०० KVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला.

याबाबत माहिती देताना ओंकार कोलते म्हणाले, “गेल्या अनेक महिन्यांपासून तळवाडी वाडीत विजेचा दाब कमी असल्याने शेतकरी आणि घरगुती ग्राहक त्रस्त होते. ही बाब मी आमदार किरण (भैय्या)सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली मी महावितरणकडे सतत पाठपुरावा केला. माझे मार्गदर्शक कै. संतोष शेठ भिंगार्डे यांच्या शिकवणुकीतूनच लोकांच्या कामासाठी झटण्याची प्रेरणा मिळाली.”

हे काम आमदार किरण (भैय्या)सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, माजी सभापती जया माने, संजय सुर्वे, साखरपा सरपंच रश्मी साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर देवरुख विभागाचे महावितरण अधिकारी राणे साहेब व साखरपा विभागाचे कदम साहेब यांच्या सहकार्याने पूर्ण झाले.

या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे तळवाडी परिसरातील सुमारे ४ वाड्यांमधील शेतीपंप आणि घरगुती वीजपुरवठा सुरळीत होणार असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.