उत्सव संस्कृतीचा, जागर शौर्याचा आणि संकल्प हिंदवी स्वराज्याचा ; दुर्गा दौड मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा आणि शौर्यशाली इतिहासाचा जागर करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी मालवणात ‘दुर्गा माता दौड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता मालवण शहरातील रामेश्वर कॉम्प्लेक्ससमोरील दुर्गा देवी मंदिरापासून या दौडला सुरुवात होणार असून, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील जेटीवर समारोप होणार आहे. या दुर्गा माता दौड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
॥ जय भवानी, जय शिवाजी ॥
उत्सव संस्कृतीचा, जागर शौर्याचा आणि संकल्प हिंदवी स्वराज्याचा या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली दुर्गा माता दौड म्हणजे केवळ एक दौड नसून, हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रप्रेमाची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
नऊ दिवसांचा आदिमायेचा जागर म्हणजेच नवरात्रोत्सव! हा उत्सव केवळ उपवास, पूजा-अर्चा आणि गरब्यापुरता मर्यादित नसून, आपल्या पवित्र हिंदू धर्माची, समृद्ध संस्कृतीची आणि उच्च जीवनमूल्यांची तरुण पिढीमध्ये जनजागृती करण्याची एक सुवर्णसंधी आहे. या पवित्र पर्वाच्या माध्यमातून माता दुर्गेचे सामर्थ्य, तिच्या शक्तिरूपाची प्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचा वारसा जनमानसात रुजविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना शौर्य, धैर्य, स्वाभिमान आणि न्याय यांची मूल्ये समाजासमोर ठेवली. त्याचबरोबर माता-भगिनींचा आदर आणि सन्मान हा समाजजीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार असल्याचा आदर्श त्यांच्या कार्यातून दिसून येतो. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांप्रती आदरभाव हीच सुसंस्कृत समाजाची खरी ओळख आहे. या मूल्यांची जाणीव आजच्या तरुण पिढीला करून देणे आणि त्यांच्यामध्ये आदर्श विचारांची रुजवण करणे ही काळाची गरज आहे.
हिंदू धर्म, संस्कृती आणि संस्कारांच्या रक्षणाचा संकल्प
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आपल्या गौरवशाली इतिहासाचा, समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा आणि संस्कारांचा प्रचार व प्रसार करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हा दुर्गा माता दौड मागील प्रमुख उद्देश आहे. आपल्या धर्म-संस्कृतीविषयी अभिमानाची भावना निर्माण करतानाच त्यातील उदात्त मूल्यांचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
शौर्य, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा जागर
समाजबांधवांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये शारीरिक सामर्थ्य, धाडस, शिस्त, एकात्मता आणि प्रखर देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी दुर्गा दौड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माता दुर्गेच्या शक्तीची प्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श समोर ठेवून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, तसेच सांस्कृतिक मूल्यांशी तरुण पिढीची नाळ अधिक दृढ करणे, हा या आयोजनामागील व्यापक हेतू आहे.
चला, या नवरात्रीत केवळ दिव्यांची आरास न करता आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची आणि संस्कृतीच्या रक्षणाची मशाल पेटवूया! आपल्या गौरवशाली इतिहासाचा, समृद्ध संस्कृतीचा आणि उदात्त संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवूया! असे आवाहन करण्यात आले आहे.













