नुतन विद्यामंदीरातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून निवळी नदीवर तात्पुरता बंधारा जलसंधारणासाठी स्तुत्य उपक्रम;

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार
मंडणगड प्रतिनिधी 
:
मंडणगड शहरात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नूतन विद्यामंदिर, मंडणगड येथील विद्यार्थ्यांनी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी श्रमदानातून पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांनी निवळी नदीतील पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधला असून, त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. हे महत्त्व ओळखून नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश दिला. निवळी नदीतील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून तात्पुरता बंधारा उभारला. या उपक्रमामुळे नदीतील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. तसेच परिसरातील पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो. पुस्तकी ज्ञानाला सामाजिक बांधिलकीची जोड
केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, परिसरातील पाणी टंचाईसारख्या गंभीर समस्येवर प्रत्यक्ष कृतीतून उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. श्रमदान, सामाजिक बांधिलकी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच श्रमाचे महत्त्व आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद अधोरेखित करणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे मंडणगडमधील नागरिकांकडून कौतुक होत आहे. ‘थेंब थेंब साठवू, पाण्याचे संकट टाळू’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची असल्याचे अधोरेखित केले आहे. फोटो ओळी निवळी नदीवर वनराई बांधताना विद्यार्थी शिक्षक व पालक