कोकण आणि सिंधुदुर्गच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा हे केंद्र ठरणार : पालकमंत्री नितेश राणे
जिल्ह्यात २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची एका वर्षात होणार सुरुवात
वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या “बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रा”चे भूमिपूजन राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरणार आहे. २२.२४ कोटी रुपयांच्या या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची येत्या एका वर्षात सुरुवात होणार असून या केंद्रामुळे रोजगाराचे नवे दालन उभे राहत असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथे मंजूर अडलेल्या “बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रा” चा पायाभरणी व शिलान्यास समारंभ शुक्रवारी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य वनसंरक्षक, कांदळवन श्री. एन. आर. प्रवीण, आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. भातुदास पालवे, विभागीय वन अधिकारी श्रीम. कांचन पवार, अतिरिक्त आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. महेश देवरे, कार्यकारी अभियंता, मत्स्यव्यवसाय श्रीम. ललितागौरी गिरिबुवा, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. नागनाथ भादुले, शास्त्रज्ञ पंकज पाटील, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग चे सहायक आयुक्त श्री. सागर कुवेसकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, सरपंच निलेश चमणकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या सह भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या सह अधिकारी आणि मच्छीमार बांधव व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
*सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा प्रकल्प*
सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा हा वेंगुर्ले येथील प्रकल्प आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय त्याच खऱ्या अर्थाने प्रदर्शन करणारा हा प्रकल्प आहे. कृषी, मत्स्य आणि पर्यटन या तीन आधारस्तंभावर आपण जेव्हा जिल्ह्याच्या तथा कोकणच्या विकासाची भाषा करतो तेव्हा हे मत्स्यबीज केंद्र येथील तरुण तरुणींना रोजगाराची संधी देणारे आहे. येथील बचत गट या केंद्रामुळे सक्षम होणार आहेत. मच्छीमार बांधवांबरोबरच आजूबाजूच्या लोकांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
सध्या देशात मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून तिथे वार्षिक ५५ लाख ३९ हजार टन मत्स्य उत्पादन होते आणि केवळ मत्स्य व्यवसायामुळे त्या राज्याला ७७ हजार ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या तुलनेत महाराष्ट्र सध्या ७ लाख ४३ हजार टन उत्पादन घेत असून राज्याचे उत्पन्न १२,७७५ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छिमारांनाही जागतिक स्पर्धेत उतरवून ताकद देण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’ दिला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही सुलभपणे कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ देखील लागू करण्यात आली आहे.
*मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून बनतात बाय प्रॉडक्ट*
या कार्यक्रमात मत्स्योत्पादनासोबतच मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धन करण्यावरही मोठा भर देण्यात आला. मासे आणि कोळंबी सोलताना निघणाऱ्या कचऱ्यापासून कॉस्मेटिक्स उद्योगात वापरले जाणारे अत्यंत मूल्यवान ‘कोलाजेन’ तयार करण्याचे कारखाने उभे राहू शकतात. आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पाचे उदाहरण देताना मंत्री राणे यांनी सांगितले की, ३० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या एका कारखान्याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल साडेचारशे कोटींची ऑफर मिळाली होती. याच धर्तीवर आपल्याकडील मत्स्य कचऱ्याचा सदुपयोग करून स्थानिकांना याद्वारे मोठा आर्थिक नफा मिळवून दिला जाईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये आणि स्थानिक पातळीवरच त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात, यासाठी मत्स्य, पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
*पुढच्या वर्षी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार*
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १२ महिन्यांच्या आत म्हणजेच पुढील वर्षी १५ ऑक्टोबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री येतील. या प्रकल्पामुळे येथील मत्स्यव्यवसाय, महिला बचत गट आणि तरुण वर्गाला मोठा फायदा होईल आणि उभादांडासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपल्या मनोगतात, पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प येत असून हा प्रकल्प जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणारा, लोकोपयोगी, रोजगार निर्मिती करणारा आणि आर्थिक सुबत्ता देणारा ठरेल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, देशातील हे पहिलेच बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र आपल्या जिल्ह्यात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद करत शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या दर्जात आणि ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण केले जाईल, अशी खात्री आयुक्त भानुदास पालवे यांनी दिली. महेश देवरे यांनी, शास्त्रोक्त पद्धतीने जिताडा प्रकारातील १ कोटी मत्स्यबीज तयार करणारा हा प्रकल्प गरिबांना श्रीमंत करणारा ठरेल आणि बायो सिक्युरिटी पाळून स्थानिकांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला जाईल, असे सांगितले. तसेच शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी, पिंजरा व नैसर्गिक प्रक्रियेद्वारे मत्स्यबीज संवर्धन करून मत्स्य उत्पादक व बचत गटांची एक साखळी तयार केली जाईल आणि मत्स्य शेतीसाठी दर्जेदार बीज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती दिली. विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी, कोकण पट्टीतील सर्वच मच्छिमारांना या प्रकल्पाचा फायदा व्हावा, यासाठी कांदळवन आणि मत्स्य विभाग पर्यावरण संवर्धनाचे रक्षण करत एकत्रितपणे काम करतील, असे सांगून शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला, प्रास्ताविकात कुवसेकर यांनी, सागरी मत्स्यव्यवसायाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा असलेल्या देशातील पहिल्या २२.२४ कोटी रुपयांच्या बहुप्रजातीय मत्स्यबीज प्रकल्पाची उभादंडा (वेंगुर्ला) येथे उभारणी केली जात असून यामुळे शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना मिळून युवकांना रोजगार मिळेल, अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छीमार नेते वसंत तांडेल यांनी तर आभार उत्कर्षा कीर यांनी मानले.













