विशेष वीज चोरीविरोधी मोहिमेत १० वीज चोरांवर कारवाई
देवगड/ प्रतिनिधी
महावितरणच्या देवगड उपविभागांतर्गत वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष वीज चोरीविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एकूण १० वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील १, पाळेकरवाडी येथील २, मोड येथील ३, वानिवडे येथील १, टेंबवली येथील २ आणि देवगड येथील १ अशा एकूण १० वीज चोरीच्या प्रकरणांवर महावितरणकडून नियमानुसार कारवाई करण्यात आली.
वीज चोरीमुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भार पडतो तसेच वीज वितरण व्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वीज चोरी, अनधिकृत वीज वापर आणि वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरोधात महावितरणची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीने ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, वीज चोरी करू नये तसेच आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती महावितरणकडे द्यावी. वीज चोरी हा कायद्याने दंडनीय प्रकार असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
देवगड उपविभागाकडून वीज चोरीविरोधातील ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून, “वीज चोरीमुक्त देवगड” करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची माहिती देवगड महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.













