लोकप्रतिनिधींसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे केले श्रमदान
मालवण | प्रतिनिधी : यंदा पावसाची मोठी तूट असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याबरोबरच जलसंधारणाच्या उपाययोजनांना विशेष भर दिला जात आहे. याच सामाजिक बांधिलकीतून मालवण नगरपरिषदेच्या वतीने रेवतळे–देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर देऊळवाडा सागरी महामार्ग परिसरात बंधारा उभारण्यात आला. गोडे पाणी अडवून ते परिसरातील जमिनीत मुरल्यास जमिनीतील जलसाठ्यांना बळ मिळणार आहे. या दृष्टीने बंधारा उभारणी करण्यात आली. या परिसरात आणखीही काही ठिकाणी बंधारे उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, या दृष्टीने अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतात. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नगरपरिषदेने पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामाला चालना दिली जात आहे. पाणी बचत व अन्य उपाययोजना यांनाही प्राधान्य दिले जात आहे. असे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी यानिमित्ताने सांगितले.
या उपक्रमात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव आणि नगरसेविका नीना मुंबरकर यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग नोंदविला. लोकप्रतिनिधींनी स्वतः श्रमदानातून दिलेला हा सहभाग जलसंधारणाच्या कार्याबाबत जनजागृती करणारा ठरला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनीही उत्स्फूर्तपणे बंधारा उभारणी मोहिमेत श्रमदान केले. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी पाण्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग आणि जलस्रोतांचे जतन यांसारख्या उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. मालवण नगरपरिषदेच्या या उपक्रमातून पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.
मालवण नगरपरिषद धामापूर नळपाणी योजनेच्या धामापूर येथील विहिरीच्या बाजूला असलेल्या वहाळावर मालवण नगरपरिषद नळपाणी योजना विभाग यांच्या पुढाकारातून व सहभागातून तसेच धामापूर, काळसे ग्रामपंचायतव व लोकसहभागातून मागील आठवड्यात प्राधान्यक्रमाने बंधारा उभारण्यात आला. मालवण शहराची जलवाहिनी असलेल्या धामापूर नळपाणी योजना विहिरीच्या बाजूला उभारणी करण्यात आलेला हा बंधारा महत्वपूर्ण ठरला. अशी माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर यांनी दिली आहे.













