गुहागर प्रतिनिधी:
रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे ‘रिगल नवदुर्गा पुरस्कार २०२६’ हा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या रेश्मा मोरे यांनी प्रास्ताविक करून कॉलेजमधील विविध कोर्सेसची माहिती दिली. तसेच नवदुर्गा पुरस्कराचे स्वरूप व उददे्श स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गुहागर येथील श्रेयश नर्सिंग होमच्या डॉ. स्वप्नाली भाले, शृंगारतळी HDFC बँकेच्या शाखा व्यवस्थापिका रमा जोगळेकर तसेच सीआरपी दीक्षा कदम उपस्थित होत्या.
प्राचार्या रेश्मा मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा हॉटल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले रिगल पाककृती पुस्तक, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेली आकर्षक फ्रेमही मान्यवरांना भेट देण्यात आली.
यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रमा जोगळेकर यांनी बँकेचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळण्याबरोबरच प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहावे आणि स्वतःचे मन नेहमी व्यस्त व सकारात्मक ठेवावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. इतर मान्यवरांनीही आपल्या कार्यातून महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बुशरा लालू यांनी केले. रिगल कॉलेजच्या प्राचार्या रेश्मा मोरे , कार्यक्रम व्यवस्थापक पूजा मोरे व सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यातून महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.













