आचरा गावच्या जलसंवर्धनाला मिळणार बळकटी

आ. निलेश राणे यांच्या पुढाकाराने पारवाडी नदीवर होणार बंधारा 

सोमवारी नदी किनारी भेट देत केली पहाणी.

आचरा,-अर्जुन बापर्डेकर 

आचरा गावच्या जलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने पारवाडी नदीवरुन समुद्राला वाहून जाणारे गोडे पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याची चाचपणी सुरू झाली आहे. सोमवारी दुपारी आ.राणे यांनी पारवाडी नदीकिनारी भेट देऊन बंधारा बाबत अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा केली.आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या बंधारा कामामुळे

नदीपात्रात अडवल्या जाणा-या गोड्या पाण्यामुळे आजूबाजूच्या भागातील भूजल पातळीतही वाढ होण्याबरोबरच

 नदीतील गाळ उपसाही होणार असल्याने भविष्यात नदीकाठच्या वस्तीला सुरक्षितता लाभणार आहे.

दोन दिवसांपूर्वी आचरा गावचे सरपंच जेरॉन फर्नांडिस आणि ग्रामस्थांनी आ. निलेश राणे यांची भेट घेऊन समुद्राच्या खाऱ्या पाण्याला अडवून गोड्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी पारवाडी नदीच्या मुखावर बंधारा घालता येण्याबाबत, मागणी केली होती.

या मागणीची तात्काळ दखल घेत आ.निलेश राणे यांनी सोमवारी दुपारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तासामंत,तालुकाध्यक्ष विनायक बाईत, जिल्हा बँक संचालक बाबा परब,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, जिल्हापरिषद सदस्या वर्षा सांबारी,पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, उपसरपंच संतोष मिराशी,राजन गावकर, जयप्रकाश परुळेकर,अभय भोसले, अनिल करंजे,ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर,चंदू कदम, पंकज आचरेकर क्षृती सावंत,सारंग, ग्रामस्थ अरुण आपकर, श्रीपाद वायंगणकर यांसह अन्य ग्रामस्थ कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत बोलताना आमदार नीलेश राणे यांनी सांगितले की

अधिकाऱ्यांनी प्रस्तावित बंधाऱ्याचे लोकेशन पाहिले असून, बंधाऱ्याची नेमकी जागा, उंची आणि त्यासाठी येणारा खर्च याचा सविस्तर अंदाज तातडीने सादर केला जाणार आहे. यंदा चाचपणी आणि अंदाजपत्रकाचे काम पूर्ण करून पुढील वर्षी पक्क्या बंधाऱ्याचे बांधकाम हाती घेण्याचे नियोजन आहे.

 नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनला वर्क ऑर्डर देण्यात आली असून लवकरच गाळ उपसा सुरू होईल.

या बंधाऱ्यामुळे अडवले जाणारे गोडे पाणी आचरा परिसरासह तालुक्यातील इतर भागात वापरता येईल का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश आ. राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या निर्णयामुळे आचरा गावच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे. आमदार निलेश राणे यांच्या तत्परते बाबत आचरा ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

 *आमदार निलेश राणे यांनी घेतले 41 दिवसांच्या गणरायाचे दर्शन*

आचरा दौ-यावर आलेल्या आमदार निलेश राणे यांनी रामेश्वर मंदिर आणि चौघड्यावरचा गणपती म्हणून ओळखला जाणारा ४१ दिवसांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत दुष्काळाचे सावट दुर करण्यासाठी मनोमन प्रार्थना केली.यावेळी देवस्थान सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.