हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत हिमांशी चौहान हिला उत्तेजनार्थ पारितोषिक
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सुमारे ३७३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. विविध सांस्कृतिक स्पर्धांनी रंगलेल्या या महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखत हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथमच उल्लेखनीय यश संपादन केले.
महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष Performing Arts शाखेतील विद्यार्थिनी हिमांशी चौहान हिने हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ‘साठा प्रथा’ या विषयावरील तिच्या एकपात्री सादरीकरणाची विद्यापीठ स्तरावर दखल घेण्यात आली. विशेष म्हणजे, या एकपात्रीचे लेखनही हिमांशी हिने स्वतः केले आहे. त्यामुळे तिच्या अभिनयकौशल्यासोबतच तिच्या सर्जनशील लेखनक्षमतेचेही दर्शन घडले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असते. यंदा हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी विशेष अभिमानाची बाब ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे सांस्कृतिक उपक्रम या यशातून अधोरेखित झाले आहेत.
या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, BPA मध्ये नाट्य शास्त्र शिकवणारे प्रा. ओमकार रसाळ आणि प्रा. आर्या वंडकर,प्रा. साई जिरोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
हिमांशी चौहान हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













