ब्राह्मण संघ महिला विभागातर्फे चिपळुणात २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान वस्तू प्रदर्शन

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघाच्या महिला विभागातर्फे महिलांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. ब्राह्मण संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ब्राह्मण संघाचा महिला विभाग गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. या कालावधीत विभागाने हळदीकुंकू, मंगळागौर, नवरात्रोत्सव, आवळी भोजन आणि गुलाब प्रदर्शन यांसारखे बिविध उपक्रम राबविले आहेत. यंदा पारंपरिक उपक्रमांबरोबरच महिलांच्या अंगभूत कौशल्याला बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा उद्देश ठेवून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दिवाळी फराळाचे पदार्थ, साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ते, विविध आकारांच्या पणत्या, आकाशकंदील, पर्स, लहान मुलांचे कपडे तसेच गोमय आणि गोमूत्रापासून तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध होतील. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वस्तूंच्या खरेदी-विक्रीबरोबरच त्या तयार करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांची ओळखही ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे भविष्यातही त्यांच्याकडून वस्तू मागविणे किंवा खरेदी करणे शक्य होणार आहे. उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असल्याचे आयोजकांनी सांगितले. हे प्रदर्शन सर्व महिला आणि पुरुष नागरिकांसाठी खुले राहाणार आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर व्यस्त असणाऱ्या नागरिकांनाही प्रदर्शनाला भेट देता यावी, यासाठी रात्रीपर्यंत प्रदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे. महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन खरेदीच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.