ओसरगाव टोलनाक्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; तिघे जखमी

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

वैभव परब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत

कणकवली : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२० वा. च्या सुमारास घडली. या अपघातात वैभव राजन परब (वय ३६, रा. बांबुळी, देवबावाडी, ता. कुडाळ) यांच्या डोक्याच्या पुढील भागाला गंभीर दुखापत झाली असून छातीला मुका मार लागला आहे. दुसऱ्या दुचाकीचा चालक अक्षय अरुण मेस्त्री (वय २९, रा. गवाणे, ता. देवगड) याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली, तर त्याच्या दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या श्रृती संतोष सुतार (रा. गडमठ, सुतारवाडी, ता. वैभववाडी) यांना किरकोळ मुका मार लागला आहे. या अपघातप्रकरणी अक्षय मेस्त्री याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार विनोद चव्हाण तपास करीत आहेत.

याबाबत वैभव यांचे वडील राजन रामचंद्र परब (वय ६०, रा. बांबुळी, देवबावाडी, ता. कुडाळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. राजन परब हे पत्नी नयना, मुलगा वैभव आणि सून शांती यांच्यासह राहतात. वैभव हे नांदगाव येथील रेल्वे कार्यालयात गेल्या सुमारे सात वर्षांपासून ट्रॅकमन पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वैभव हे आपल्या घरातून हिरो कंपनीच्या आय-स्मार्ट मॉडेलच्या सिल्व्हर रंगाच्या दुचाकीने (क्र. एमएच ०७ एए ६७१९) नांदगाव येथील रेल्वे कार्यालयात कामावर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास ओसरगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली.

राजन परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओसरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील टोलनाक्याच्या चौथ्या लेनमध्ये सुरुवातीच्या गतिरोधकापासून सुमारे पाच मीटर अंतरावर हा अपघात झाला. वैभव परब हे नियोजित मार्गाने जात असताना मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी काळ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच ०८ बीए ९०६०) विरुद्ध दिशेने, म्हणजेच विरुद्ध दिशेने आली. या दुचाकीचा चालक अक्षय अरुण मेस्त्री याने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच्या दुचाकीची वैभव यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसून अपघात झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले. तेथील १०८ रुग्णवाहिकेतून अपघातातील तिन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, ओरोस येथे नेण्यात आले. ओसरगाव येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रातील वाहतूक पोलिसांनी सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास वैभव यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर राजन परब हे आपल्या वाहनाने ओरोस येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचले.

रुग्णालयात गेल्यानंतर राजन परब यांना अपघातातील दुसऱ्या दुचाकीचा चालक अक्षय मेस्त्री आणि त्याच्या मागील सीटवर बसलेली महिला श्रृती सुतार यांची माहिती मिळाली. या अपघातात वैभव परब यांच्या डोक्याच्या पुढील भागाला गंभीर दुखापत झाली असून छातीला मुका मार लागला आहे. अक्षय मेस्त्री याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून श्रृती सुतार यांना किरकोळ मुका मार लागला आहे. या धडकेत वैभव परब यांच्या दुचाकीच्या पुढील चाकाचे, हँडलचे तसेच मुख्य हेडलाईटसह पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसऱ्या दुचाकीचेही किरकोळ नुकसान झाले आहे. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने दुचाकी चालवून अपघात घडवून आणल्याने तिघांच्या दुखापतीसह दोन्ही वाहनांच्या नुकसानीस अक्षय मेस्त्री कारणीभूत असल्याचे नमूद करीत राजन परब यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११९, १७७ व १८४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १२५(अ), १२५ (ब) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद चव्हाण या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.