राजापूर (वार्ताहर): राजापूर वासियांचे श्रध्दास्थान श्री देव धुतपापेश्वर आणि गुजराळी येथील येथील श्रीदेव लक्ष्मीनारायण यांचा हरि-हर भेटीचा पारंपारिक सोहळा निशाण काठी या ठिकाणी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.
पालखी सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सोहळयासाठी गुजराळी येथील श्री देव लक्ष्मीनारायण आणि धोपश्वर येथुन श्री देव धुतपापेश्वर पालखीचे सवाद्य मिरवणुकीने टाळ-मृदंगाचा गजर, हरी नामाचा जयघोष करत पालखी निशाणकाठी कडे प्रस्थान करण्यात आली. या ठिकाणी श्री देव लक्ष्मी नारायण आणि श्रीदेव भवानी शंकर श्री धूतपापेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन होऊन ‘ हरीहर ‘ भेटीचा तो नेत्रदीपक सोहळा ‘ याची देही ,याची डोळा ‘ सर्व भाविकांना पहावयास मिळाला. असा अभूतपूर्व सोहळा पाहिल्यानंतर सर्वांनी दोन्ही पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला. हरीहर भेटीनंतर श्रींची पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखीच्या मार्गावर सुहासिनींनी श्रींच्या पालखीचे औक्षण केले.
पालखी मार्गावर आकर्षक सजावट करण्यात आलेली होती . भाविकांमध्ये सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रींची पालखी नाचवण्यात आली. पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात, मोठ्या उत्साहात व श्रद्धेने पार पडला. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पालखीचे दर्शन घेतले. नंतर पालखी मंदिरात परतल्यानंतर आरती करण्यात आली आणि सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.












