इन्सुली सोसायटीचे चेअरमन साबाजी उर्फ दादा परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!
वेंगुर्ल्यात आज ‘फोक आख्यान’चा रंगणार सांस्कृतिक सोहळा; शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी : कोकणची संस्कृती, येथील माणसांचा प्रेमळ स्वभाव आणि अस्सल खाद्यपरंपरेचा अनुभव घेत प्रसिद्ध ‘फोक आख्यान’च्या कलाकारांनी इन्सुली येथे सदिच्छा भेट दिली. इन्सुली सोसायटीचे चेअरमन साबाजी उर्फ दादा परब यांच्या निवासस्थानी या कलाकारांचे आपुलकीने स्वागत करण्यात आले. यावेळी कलाकारांनी कोकणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत पाहुणचाराचा आनंद लुटला.
मनीष दळवी यांच्या ‘आपलो सिंधुदुर्ग, आपली जबाबदारी’ या मिशनअंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने वेंगुर्ला येथे ‘फोक आख्यान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध मेजर ध्यानचंद क्रीडांगण, कॅम्प रोड येथे सायंकाळी ७ वाजता हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी ‘फोक आख्यान’ची संपूर्ण टीम सिंधुदुर्गात दाखल झाली आहे.
दरम्यान, या आख्यानातील प्रसिद्ध गायक ऋषिकेश बालकृष्ण रिकामे आणि साबाजी उर्फ दादा परब यांचे चिरंजीव सौरभ परब हे मित्र आहेत. सौरभ परब यांनी आपल्या मित्राला आणि त्यांच्या सहकलाकारांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला मान देत कलाकारांनी इन्सुली येथील परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत कोकणच्या पाहुणचाराचा अनुभव घेतला.
माध्यमांशी संवाद साधताना प्रसिद्ध गायक ऋषिकेश बालकृष्ण रिकामे यांनी कोकणातील माणसांच्या प्रेमळ स्वभावाचे आणि पाहुणचाराचे विशेष कौतुक केले. “कोकणची माणसं जेवढी गोड आहेत, तेवढाच त्यांनी केलेला पाहुणचारही गोड आहे. कोकण हा संस्कृती जपणारा जिल्हा असल्यामुळे येथे आमची कला सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो. कोकणातील लोकांनी आम्हाला प्रेम द्यावे, हीच अपेक्षा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.













