प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांचे निर्देश
कणकवली : ग्रामीण भागातील युवकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे, तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये कणकवली तालुक्यातील युवकांनी आपले स्थान निर्माण करावे, या उद्देशाने तालुक्यात दरवर्षी चार व्यायामशाळा उभारण्याची मागणी पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या मागणीला कासार्डे विभागाचे पंचायत समिती सदस्य अण्णा खाड्ये यांनी अनुमोदन दिले होते.
या मागणीच्या अनुषंगाने कणकवलीचे गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. त्यानुसार व्यायामशाळा उभारण्यासंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील युवकांना व्यायामासाठी आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्यास त्यांना नियमित व्यायामाची सवय लागेल. तसेच शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासोबतच शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहन मिळेल. गावागावांत व्यायामशाळा उभारल्यास युवकांच्या आरोग्याला चालना मिळण्यास मदत होईल, असा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांनी सांगितले.
येत्या काळात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण युवकांना व्यायामशाळांच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.












