संतोष कोत्रे
लांजा : मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी पुल येथील अपघाताची मालिका थांबण्यास तयार नसल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पर्यायी मार्गाचा सर्वे केला जात असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंजनारी घाटातील अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात तरी या ठिकाणी दहा ते बारा अपघात झाले आहेत . तर गेल्या आठवड्यात कंटेनर आयशर ट्रक यांचे चार अपघात झाले आहेत. या ठिकाणी अवजड वाहनांचे सातत्याने होणारे अपघात ही राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर मोठी डोकेदुखी ठरली आहे.
आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. या ठिकाणी गतीरोधक बसवूनही अपघात थांबत नसल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनांच्या नुकसानी बरोबरच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतुकीचा आणि प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आंजणारीपुलाला पर्यायी मार्ग शोधला जात आहे. त्यासाठी काजळी नदीमध्ये नव्याने पूल उभारला जावा लागणार आहे. आंजणारी वरचा स्टॉप येथून हा पर्यायी मार्ग नदीतून काढला जाणार असण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वे केला जात असून सुमारे वीस कोटी रुपये अंदाजीत खर्च येणार आहे. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त होत असून तसे झाल्यास अंजनारी येथील वाहनांचे अपघात रोखण्यास निश्चितच फायदा होणार आहे.













