फलाटांसमोर पाणी साचल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, फलाटासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानकातील सांडपाणी फलाटांसमोर साचत आहे. तसेच साचलेले पाणी चौकशी कक्षापर्यंत पोहोचत आहे. फलाटांवर बस उभ्या राहत असल्याने प्रवाशांना याच साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत बसमध्ये चढावे आणि उतरावे लागत आहे. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना फलाटावर उभे राहतानाही अडचणी येत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाने या पाणीगळतीची तातडीने दखल घेऊन साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.













