चिपळूण न.प.तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव व सेवा संकल्प अभियानातील विजेत्यांचा गौरव
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरपरिषदेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत आयोजित पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव स्पर्धा असल्या तरी पर्यावरणाचा संबंध पाण्याशी येतो. यावर्षी पाऊस कमी पडल्याने आज जरी चिपळूण शहरात दोनवेळा मुबलक पाणी मिळत असले तरी पुढे परिस्थिती भयावह आहे, त्यामुळे भविष्यात पाणी कमी होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच थेंब थेंब पाणी वाचवा. अगदी लहानसहान गोष्टीची काळजी घ्या ब्रश करताना पाणी गरजेपुरतेच वापरा, विद्यार्थ्यांनी बाटलीत उरलेले पाणी झाडांना घाला, जेणे करून त्या झाडाची गरज भागेल, पाणी हे जीवन आहे त्याचा योग्य विनीयोग करा, असे आवाहन भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी केले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांनी यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आपण खचून न जाता पुढच्या वर्षी जोमाने भाग घ्या व यशस्वी व्हा असा संदेश दिला. चिपळूण नगरपरिषदेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत आयोजित पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२६ तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांचा सोमवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात गौरव सोहोळा आयोजित केला होता. यावेळी मोदी बोलत होते.
उपनगराध्यक्षा सौ. रुपाली दांडेकर म्हणाल्या आपण आणि पर्यावरण वेगळे नाही. सेवासंकल्प अंतर्गत महिनाभर पंतप्रधान मोदी यांच्या २५ वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झाल्याने अनेक उपक्रम राबविण्यात आले. भविष्यात आपल्या सर्वांना दुष्काळ परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. पाणी या विषयाला व्यवस्थित हाताळायला हवे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन करून स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी झालेल्यांचे अभिनंदन केले. परिक्षक संतोष केतकर यांनी स्पर्धा अतिशय टफ होत्या, यातून नंबर काढतांना खूपच बारकावे पाहावे लागले. सर्वांचीच सजावट उत्तम होती. पर्यावरण पूरक स्पर्धा असल्याने प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. शाडूच्या मातीच्या मूर्तीच मूर्तीकारांनी बसवून लोकांना त्याची सवय लावयला हवी, असे आवाहन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजप गटनेते शशिकांत मोदी, शिवसेना गटनेते अंकुश आवले, मागासवर्ग सभापती नीलम जाधव, महिला व बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, उपसभापती राणी महाडिक, सभापती कपिल शिर्के, नगरसेविका अंजली कदम, वैशाली कदम, नगरसेवक संजय गोताड, गणेश आग्रे, मुख्याधिकारी संजय जाधव, रांगोळीकार संतोष केतकर, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, संतोष शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील मान्यवरांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गणेश मूर्तिकारांच्या सन्मान करताना सर्व सहभागी मूर्तिकारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत विनायक आंबेकर, खंड प्रथम, विजय सागवेकर, शंकर वाडी-द्वितीय तर राजेंद्र माजलेकर, खंड तृतीय यांचा गौरव करण्यात आला. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत ओंकार मुकुंद काणे-प्रथम, विपुल गोगटे द्वितिय, साहिल ठाकरे- तृतीय तर उत्तेजार्थ विशाखा चितळे व अक्षय कुडाळकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील यशस्वी स्पधेकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.












