अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथील हायवेच्या शेजारी असलेल्या एका उघड्या शेडमधून पार्क केलेली लाल-काळ्या रंगाची हिरो एचएफ डीलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला है.
या प्रकरणी विजय विलास लांडगे (वय २८, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, मूळ रा. मनेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली, सध्या रा. माळगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला, सिल्वर एकर्स, निरवडे, ता. सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ५:३० वाजे दरम्यानच्या अवधीत ही चोरी झाली. फिर्यादी यांनी आपली लाल-काळ्या रंगाची हिरो कंपनीची एचएफ डीलक्स (मोटरसायकल क्रमांक MH 10 DE 6866) ही गाडी जितेंद्र गावकर यांच्या वेत्ये येथील हायवे लगतच्या उघड्या शेडमध्ये उभी केली होती. यादरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून ही गाडी लांबवली.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार धोत्रे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पोलीस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.












