
कोलगाव येथे कारवाई : वाहनचालकासह ६४ वर्षीय व्यक्ती ताब्यात
सावंतवाडी: केरवडे-कुडाळ मार्गे कोल्हापूर जिल्ह्याकडे बेकायदेशीर आणि निर्दयीपणे गोवंश वाहतूक करण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे यशस्वीरित्या उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनचालकासह एका ६४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर ‘प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ०४ ईसी ७६८३ या क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सि वाहनातून रघुनाथ जाधव (वय ६४, रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि चालक सागर गुरव (रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) हे दोघे दोन गायी आणि त्यांची अवघी सात दिवसांची दोन वासरे यांची विनापरवाना वाहतूक करत होते.
केरवडे-कुडाळ मार्गे कोल्हापूरला जात होती वाहतूक
सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे तपासणी केली असता, ही वाहतूक केरवडे-कुडाळ मार्गे भुदरगड (कोल्हापूर) येथे जात असल्याचे निष्पन्न झाले. जनावरांची वाहतूक करताना ‘प्राण्यास निर्दयतेने वागविणे’ या कायद्याचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचे आणि वाहतुकीसाठी आवश्यक कोणताही परवाना नसल्याचे यावेळी समोर आले.
याप्रकरणी, सावंतवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत रघुनाथ जाधव आणि चालक सागर गुरव यांच्याविरुद्ध ‘प्राण्यास निर्दयतेने वागविणे’ तसेच विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो मॅक्सि वाहन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन गायी आणि दोन वासरे यांची तात्काळ जवळच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली असून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोवंश तस्करीचे धाडस वाढू नये यासाठी गो-रक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील सावंतवाडी पोलिस ठाण्यात उपस्थिती लावली होती.













