लांब उडीत करण गवळीची राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

६०० मीटर धावण्याच्या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबाद येथे होणार स्पर्धा

सावंतवाडी : कारिवडे गवळीवाडी येथील आणि राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा विद्यार्थी कु. करण आनंद गवळी याने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या क्रीडागुणांची छाप पाडली आहे. विशेष म्हणजे, ६०० मीटर धावण्याच्या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे कारिवडे गावासह सावंतवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत करणने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने ६०० मीटर धावण्याच्या प्रकारात दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याचा बहुमान मिळविला. राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा १४ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हैदराबाद, तेलंगणा येथे होणार आहे. या स्पर्धेत करणकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

करणच्या या यशामागे त्याची मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

करण आनंद गवळी याने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने तसेच गवळी समाजाच्या वतीने त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही कौतुक करण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही करणने उत्तम कामगिरी करून गवळी समाजासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीने दिल्या आहेत.

कारिवडेच्या करणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही गावासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.