५१ जलप्रेमींचा सहभाग; संपूर्ण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाच सदस्यीय समित्या स्थापन होणार
देवरूख (प्रतिनिधी):
सप्तलिंगी नदीचे पुनरुज्जीवन आणि संभाव्य दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने आयोजित तिसरी सप्तलिंगी नदी परिषद देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहात पार पडली. या परिषदेला ५१ जणांनी सहभाग नोंदवला. सप्तलिंगी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी व
दुष्काळावर मात करण्यासाठी या परिषदेत कृती आराखडा निश्चित करण्यात आला.
या परिषदेत जलसाक्षर समिती महाराष्ट्र राज्याचे जलयोद्धा शहनवाज शाह, जलप्रेमी युयुत्सु आर्ते, सोळजाई ग्रामदेवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, देवरुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य सरदार पाटील आणि साडवलीचे प्रकाश डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक रुपेश भागवत, माजी पंचायत समिती सभापती संतोष लाड यांच्यासह विविध गावांतील सरपंच, देवस्थानांचे पदाधिकारी, जलदूत, जलप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी पाणीसमस्या व जलसंधारणाचे अनुभव मांडले.
कृती आराखड्यातील महत्त्वाचे निर्णय
परिषदेत उपस्थितांच्या समोर जलसंधारणासाठी प्राथमिक कृती आराखडा निश्चित करण्यात आला. त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
समन्वय समिती : सप्तलिंगी नदी परिषद समन्वय समिती’ पाच सदस्यांची स्थापन करण्यात येणार.
गाव समित्या : नदीकाठावरील १९ गावांसह संपूर्ण सप्तलिंगी पाणलोट क्षेत्रातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक गावात पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार.
वनराई बंधारे : सप्तलिंगी नदीकाठावरील ज्या गावांना वनराई बंधारे उभारायचे आहेत, त्यांनी तातडीने सप्तलिंगी नदी परिषदेकडे संपर्क साधावा.
जलतारा खड्डे : नदीवरील शिवलिंग देवस्थानांमध्ये पूजेसाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि गावातील पाणीसाठा वाढावा, यासाठी आवश्यकतेनुसार जलतारा खड्डे करण्याचे नियोजन. यासाठी ग्रामपंचायतीने अधिकृत लेटरहेडवर मागणीपत्र किंवा प्रस्ताव द्यावा. परिषदेत मांडलेल्या नियोजनानुसार, २४ तासांत मंजुरी मिळवून काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मार्लेश्वर येथे बंधारा : मार्लेश्वर देवस्थान, मारळ यांच्या मागणीनुसार शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता देवस्थानाच्या पायथ्याशी, पार्किंगजवळील नदीपात्रात बंधारा उभारणीचे काम सुरू करण्याचे नियोजन.
कुडवली येथे पाहणी : बंधाऱ्याच्या मागणीच्या अनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार.
जलस्रोतांचा शोध : प्रत्येक गावातील नैसर्गिक जलस्रोत, दुर्लक्षित विहिरी व तळी शोधून त्यांची माहिती परिषदेकडे सादर करणे.
गावपातळीवर बैठका : ग्रामपंचायत, ग्रामदैवत देवस्थान, शिवलिंग देवस्थानांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना एकत्र आणून बैठका घेणे व गावनिहाय जलसंधारण कृती आराखडा तयार करणे. परिषदेत उजगाव येथील शेतकऱ्यांनी आणलेल्या यंदाच्या सप्तलिंगी लाल भाताचे मान्यवरांच्या हस्ते मुहूर्तपूजन करण्यात आले. क्रांती व्यापारीतर्फे सूत्रसंचालन सुरेंद्र ऊर्फ भाऊ शिंदे यांनी केले, तर अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी मनोगत व आभारप्रदर्शन केले. सप्तलिंगी नदीचे संवर्धन, धार्मिक पर्यटनाचा विकास आणि जलसंधारणाच्या माध्यमातून संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. सभागृह व चहाची व्यवस्था केल्याबद्दल बारक्या शेठ बने यांचे आभार मानण्यात आले. आयोजनासाठी सचिव अण्णा बेर्डे, सहसचिव संदीप वेल्हाळ, आकाश भोपळे, प्रभाकर मांगले आणि साई कामेरकर यांनी विशेष मेहनत घेतली. गावागावांत जलसंधारणाची प्रत्यक्ष कामे उभी करून एकजुटीने दुष्काळावर मात करण्याचा निर्धार व्यक्त करत परिषद संपन्न झाली.













