सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट; जिल्हा बँक देणार सर्वोतोपरी सहकार्य
दूध संस्थांनी पुढाकार घेऊन पात्र शेतकऱ्यांची निवड करावी;
अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
आंबा-काजू पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुग्धव्यवसायाचा भक्कम पर्याय उभा करण्याचा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या उपक्रमासाठी पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यापासून त्यांना आर्थिक पाठबळ देण्यापर्यंत बँक सर्वोतोपरी सहकार्य करेल. दुग्ध संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात आयोजित दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.या सभेला बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्धव्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत शेतीला पूरक असलेला दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा नियमित स्रोत बनू शकतो. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडून शेतकऱ्यांचा गट तयार करावा. गावागावांत असे गट निर्माण झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी जिल्हा बँक स्वीकारेल.
लाभार्थी निवडताना अनुभवाला प्राधान्य द्या!
दुधाळ जनावरे खरेदी योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दुग्ध संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. केवळ शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून लाभार्थी निवडण्याऐवजी दुग्ध संस्थांशी संबंधित, दुग्धव्यवसायाचा अनुभव आणि आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करावी. जनावरांची खरेदी केल्यानंतर त्यांचे संगोपन, चारा-पाणी आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्याची क्षमता लाभार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. यंदा संभाव्य पाणीटंचाईचे आव्हान लक्षात घेता लाभार्थी निवडताना विशेष दक्षता घ्यावी. स्थानिक परिस्थितीची माहिती आणि अनुभव असल्याने दुग्ध संस्थांना योग्य शेतकऱ्यांची निवड अधिक प्रभावीपणे करता येईल, असे दळवी यांनी स्पष्ट केले.
दुधाळ जनावरांचे संगोपन करताना चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनीही प्रत्येक दूध उत्पादकाला किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.जिल्ह्यात दूध संकलन वाढविणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतही जिल्हा बँक सकारात्मक आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.









