राजापूर । प्रतिनिधी : राजापूर शहरातील हर्डिकरवाडयातील रहिवासी व लांजा येथील कालभैरव योगेश्वरी मंदिरचे व्यवस्थापक त्यागराज उर्फ संजय माधव हर्डीकर (६२) यांचे मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने रत्नागिरी येथे निधन झाले.
मुळचे राजापूर शहरातील हर्डिकरवाडा येथील रहिवाशी असलेले त्यागराज हर्डिकर हे गेले काही वर्षे लांजा येथे कालभैरव योगेश्वरी मंदिरचे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. एक अभ्यासू, साहित्यप्रेमी असलेले हर्डिकर यांनी काही काळ राजापुरात विविध वर्तमान पत्रात पत्रकारिताही केली होती. तर ते कवी देखील होते, त्यांच्या अनेक कविताही प्रसिध्द आहेत. राजापूर शहरासह ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना जाण होती, राजापूरच्या सामाजिक, राजकिय, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडीत त्यांचा सक्रिय सहभाग असे. एक व्यासंगी, अभ्यासू व धार्मिक अध्यात्माची जाण असलेले व्यक्तीमत्व अशीही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. ते गेले काही वर्षे लांजा येथे कालभैरव योगेश्वरी मंदिरचे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. या ठिकाणीही त्यांनी या मंदिर व्यवस्थापनपदाच्या माध्यमातुन आपले अध्यात्माचे कार्य सुरू ठेवले होते.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्यावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे.
फोटो कै. त्यागराज हर्डिकर












