दापोली :
दापोली तालुक्यातील केळशी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत संयुक्त बचत (जॉइंट सेव्हिंग) खाते असलेल्या एका व्यक्तीच्या खात्यावरून परस्पर ३ लाख ९९ हजार २२९ रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश गणपत सावंत (वय ४६ वर्षे, सध्या रा. शिवडी, मुंबई, मूळ रा. केळशी कांदेवाडी, ता. दापोली) यांचे बँक ऑफ इंडियाच्या केळशी शाखेत खाते आहे. १२ ऑक्टोबर २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ या १० दिवसांच्या कालावधीत हा प्रकार घडला.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादींच्या संमतीशिवाय आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या बँक खात्यातील रक्कम वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन आयडीच्या माध्यमातून परस्पर अन्यत्र वळवली. या आर्थिक व्यवहारांमध्ये फिर्यादींची एकूण ३,९९,२२९.७१ रुपयांची फसवणूक झाली आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
फिर्यादी शैलेश सावंत यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २०२३ चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.










