रत्नागिरी, : केंद्रीय विद्यालय नाचणे, रत्नागिरी येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व, सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच संस्थानांच्या विलीनीकरणाद्वारे भारताच्या एकीकरणासाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य याविषयी आपले विचार भाषणातून व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण कुमार यांनी सभेला संबोधित करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान कार्याचा गौरव केला. त्यांनी विद्यार्थ्यांना देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच भाषा, धर्म, जात आणि प्रांत यांतील विविधता असूनही आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना मनात रुजविण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, परस्पर सहकार्य, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि देशाप्रती कर्तव्यभावना जोपासण्याचा संदेश दिला. भारताच्या प्रगतीसाठी एकता आणि सामूहिक प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना निर्माण करणारे विचार मांडण्यात आले. राष्ट्रीय एकता ही केवळ एक दिवसापुरती मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनातील आचरणाचा भाग असली पाहिजे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पवार, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय एकता दिवसाचा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
एकता हीच भारताची शक्ती आणि विविधतेत एकता हीच भारताची ओळख!













