सिंपन प्रतिष्ठानतर्फे आयोजन; प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांची माहिती
कणकवली : सिंपन प्रतिष्ठान, मुंबई (रजि.) यांच्या वतीने सिंधुदुर्गतर्फे ‘सिंपन चषक २०२७’ या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २४ रोजी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होईल. जिल्ह््यातील उदयोन्मुख खेळाडूंना वाव मिळून देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. तांबे बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळकृष्ण जाधव, बी. एस. कदम, दत्ता पवार, सत्यविजय तांबे, राजेश कदम, कौस्तुभ तांबे, युवराज कदम उपस्थित होते.
श्री. तांबे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढीच्या क्रीडा गुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खेळ, जिद्द, संघर्ष आणि विजय या मूल्यांची सांगड घालत जिल्ह्यातील जेन-जी आणि जेन-अल्फा पिढीला एकत्र आणण्याचाही स्पर्धेमागील उद्देश आहे. क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी १५ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. याशिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाल अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत.
सिंपन प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक तसेच विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत आहे. कणकवली तालुक्यातील जानवली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भव्य स्मारक शिल्प, संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या ठिकाणी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसह वैद्यकीय सुविधा, व्यवसाय मार्गदर्शन, महिला सबलीकरण, कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भरीव कार्य करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न आहे, असे श्री. तांबे यांनी सांगितले.













