मार्गताम्हाणे महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उपक्रम उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यावसायिकतेची जोड

चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहारज्ञान, व्यावसायिक दृष्टिकोन आणि उद्योजकतेची ओळख व्हावी, या उद्देशाने मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मार्गताम्हाणे येथे अकरावी व बारावी वाणिज्य विभागाच्या वतीने ‘दिवाळी बाजार’ या अभिनव उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील रुक्मिणी गणपत चव्हाण सभागृहात आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला व्यावसायिक कौशल्याची जोड देत विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. दिवाळी फराळ, विद्यार्थ्यांनी स्वतः रंगविलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू तसेच विविध हस्तकला साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूंची निवड, उत्पादनाचे सादरीकरण, किंमत निश्चिती, जाहिरात, ग्राहकांशी संवाद, विक्री व्यवस्थापन तसेच नफा-तोट्याचे गणित अशा व्यावसायिक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. पुस्तकी अभ्यासाबरोबरच बाजारपेठेतील व्यवहार कसे चालतात, ग्राहकांच्या गरजा कशा ओळखायच्या आणि व्यवसायाचे नियोजन कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, नियोजन कौशल्य आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत झाली. विशेष म्हणजे, स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करताना विद्यार्थ्यांनी दाखविलेला उत्साह आणि व्यावसायिक दृष्टिकोन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भाऊ लकेश्री, पर्यवेक्षक विनोद पवार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सौ. वर्षा भोबस्कर, प्रा. सौ. तन्वी भागवत, प्रा. सौ. भारती येवले आणि श्रीमती शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रदर्शनाच्या आयोजनात बारावी वाणिज्य शाखेचे गटप्रमुख गौरव शिर्के, आयुष पेजले, शुभ्रा चव्हाण, सानिका बोबले, दीक्षा बोबले आणि श्रावणी जाधव यांनी उत्तम नियोजन करून मोलाचे सहकार्य केले. ‘शिका, अनुभव घ्या आणि उद्योजकतेकडे वाटचाल करा’ हा संदेश देणारा ‘दिवाळी बाजार’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला. शिक्षणातून उद्योजकतेची बीजे रुजविण्याचा महाविद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.