गुहागर प्रतिनिधी :
जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाणी योजना, स्मार्ट मीटरची सक्ती, निकृष्ट बंधारे, रस्त्यांची दुरवस्था आणि शिक्षणासह विविध विभागांच्या समस्यांवरुन गुहागर पंचायत समितीची आमसभा मंगळवारी चांगलीच गाजली. ज्यांची दोन लाखांची पत नाही, अशांना २०० कोटींची कामे दिली, त्यामुळे जलजीवन योजनेचा बोजवारा उडाला, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी ठेकेदार आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर स्मार्ट मीटरच्या सक्ती वरुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गुहागर पाटपन्हाळे येथील मंगल कार्यालयामध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आमसभा जाधव यांनी अतिशय शांततेत हाताळली. काताळे येथील अपूर्ण पाणी योजना, पेवे राब भोईवाडी येथील जल जीवन योजना अद्याप सुरुही झालेली नाही या विषयावर आमदार जाधव यांनी जल जीवनचा पुन्हा एकदा पाढा वाचला. ज्याची दोन लाखाची पत नाही अशांना २०० कोटीची कामे देण्यात आली आहेत. काही ठेकेदारांनी मी भूमिपूजन केले म्हणून मुद्दामहून कामे चालूच केलेली नाहीत. तर योजना पूर्ण करण्याकरिता सरकार पैसे देईल असे वाटत नाही असे म्हणत तालुक्यातील पाणी योजनांचा आढावा घेतला. या दुष्काळी परिस्थितीतही माझ्या मतदारसंघांमध्ये टैंकर लागणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत असेही सांगितले.
स्मार्ट मीटर बाबत अनेक तक्रारीचा पाढा ग्रामस्थांनी वाचला यावर आमदार जाधव यांनी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतानाच शृंगारतकी उपकेंद्रातील सोनवणे यांची चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याचा ठरावही घेतला. यापुढे पोलिसांनी स्मार्ट जबरदस्तीसाठी सहकार्य करु नये व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही प्रकारची जबरदस्ती करुन स्मार्ट मीटर मीटरच्या बसू नये, अशी ही समज दिली. कोतळूक शिगवणवाडी येथील
बांधलेला १९ लाख रुपयाचा बंधारा एक वर्षातच ढासळला असून अद्यापही ठेकेदाराने तो दुरुस्त केलेला नसल्याचे पुढे संबंधित विभागाला समज दिली.
आमसभेत मुख्याधिकारी किंवा अन्य प्रतिनिधी उपस्थित नाहीत. ते कधीही चर्चेलाही बसत नसल्याने यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मांडून तो राज्याच्या नगरविकास प्रशासनाकडे पाठवण्यात येईल, असा ठराव
मांडण्यात आला. वेळेवर न सुटणाऱ्या बेसेस आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणार हाल सचिन बाईत यांनी निदर्शनास आणून दिले.
उमेश खैर यांनी तालुक्यात ब्लडबँक किंवा एखादे स्टोअरेज असावे असा मुद्दा मांडला. तालुक्यातील पिंपर शाळेवर आणखी एका शिक्षकाची मागणी करण्यात आली. यावर मुले असूनही शिक्षक नाहीत अशा शाळांवर बंद पडलेल्या शाळांचे शिक्षक द्यावेत असे गटशिक्षणाधिकाऱ्यांना आ. जाधव यांनी आदेश दिले. तसेच तालुक्यात पगार घेऊन सातारा येथे बदली करण्यात आलेल्या शिक्षकाला पुन्हा येथे बोलवावे किंवा त्याची थेट बदली करावी, असे सूचित केले.
एसटी अपघातामध्ये कातळे नवानगर येथील महिला गंभीर जखमी झाली असून मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवले असल्याची माहिती जि.प.चे कृषी व पशु संवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी दिली.
यावर आमदार जाधव यांनी एसटी विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून उपचारासाठीच्या खर्चाची कार्यवाही व्हावी असा सूचना दिली. यावेळी ई पीक पाहणीबाबत उपस्थित केलेल्या शंकेचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी निरसन केले.
यावेळी सभापती प्रणव पोळेकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, जि. प. सदस्य विक्रांत जाधव, प्रमोद गांधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गुहागर तालुका शांत तालुका आहे, शांतच राहू द्या गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने आम्हाला पाच पैसे दिले नाहीत, असे असले तरी आपल्या मतदारसंघातील रस्ते सुस्थितीत आहेत, कोणतीही शाळा कोणाच्याही अंगणात भरत नाही, मात्र यावर्षीपासून निधी दिला जात आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागात काय चालते याची संपूर्ण माहिती ठेवावी, गुहागर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर व्हावा असा ठरावही आपण यावेळी घेतला असल्याचे सांगताना तालुका शांत आहे शांतच राहू द्या, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.













