चिपळूण (प्रतिनिधी): कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेजर पुन्हा सुरु करण्याच्या मागणीला व तसेच चिपळूण दादर स्वातंत्र गाडीच्या मागणीला ठेंगा दाखवत मध्य रेल्वेने त्याजागी उत्तर प्रदेशच्या प्रवाशांसाठी दादर-गोरखपूर ट्रेन कायमस्वरुपी सुरु केली आहे. कोकणवासीयांची गैरसोय दुर करण्याऐवजी यूपीच्या गाडीचा मार्ग मोकळा करण्याच्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोकणावर पुर्णपणे अन्याय झाला आहे हे आम्ही कदापी सहन करणार नाही. अशी संताप व्यक्त करुन कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
व ते पुढे म्हणाले की, तब्बल ३२ वर्षे कोकणवासीयांच्या सेवेत धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना काळात बंद करण्याचा निर्णय झाला व ही गाडी दिव्यापर्यंत चालवली जात आहे. पूर्वीप्रमाणे मुंबईतील कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी पूर्ववत चालवण्याची आमची मागणी आहे. या मागणीला न जुमानता मध्ये रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजर च्या जागी दादर-गोरखपूर ट्रेन सुरु केली आहे.
दादर रत्नागिरी पॅसेंजरला आमच्या मागणीप्रमाणे संगमेश्वर, चिपळूण, खेड यांना आरक्षित डब्बे ठेवण्यात आले होते. रेल्वे मंत्रालयाने दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या मागणीला केराची टोपली दाखवली आणि गोरखपूर ट्रेन सुरु केली हा कोकणाचा अपमान आहे.
दादर पॅसेंजर रत्नागिरी व दादर-चिपळूण या गाड्या तात्काळ सुरु न केल्यास त्रीव आंदोलन केले जाईल. असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.











