अझीम जैतापकर आणि अरविंद लांजेकर यांचे महावितरणला निवेदन
राजापूर प्रतिनिधी : राजापुरात महावितरण कंपनीकडून दर सोमवारी करण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे राजापूर शहरातील शासकीय कार्यालयांसह विविध आस्थापनांचे कामकाज ठप्प होत असल्याने ही देखभाल दुरुस्ती अन्य दिवशी करण्यात यावी, अशी मागणी राजापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अझीम जैतापकर आणि कोंढेतडचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या राजापूर उपविभाग क्रमांक १ च्या उपअभियंत्यांना निवेदन सादर केले.
महावितरणकडून दर सोमवारी वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, सोमवार हा आठवड्याचा पहिला कामकाजाचा दिवस असल्याने त्याचा मोठा परिणाम शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे.
राजापूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक शासकीय कामांसाठी शहरात येत असतात. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, गटविकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती, पोलीस ठाणे, बांधकाम विभाग, शासकीय रुग्णालय तसेच शाळा आणि अन्य कार्यालयांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने कामकाजात अडथळे निर्माण होतात. परिणामी, दूरवरून आलेल्या नागरिकांना विनाकारण प्रतीक्षा करावी लागते आणि त्यांची गैरसोय होते.
वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असले, तरी त्यासाठी सोमवारसारखा महत्त्वाचा कामकाजाचा दिवस निवडणे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे शनिवार किंवा रविवारी याचे नियोजित करावे. यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरळीत राहण्यास मदत होईल आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.













