जिल्हास्तरीय तायक्वॉडो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलची दमदार कामगिरी; ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांची कमाई

खेड (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्हास्तरीय तायक्वॉडो अजिंक्यपद स्पर्धेत खेड येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण २० पदके पटकावली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रत्नागिरी तायक्वॉडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका तायक्वॉडो ॲकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वॉडो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये २४ वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर, ९ वी कॅडेट, २४ वी सिनिअर क्योरुगी तसेच १३ वी सब-ज्युनिअर, ९ वी कॅडेट, १३ वी ज्युनिअर व सिनिअर पुमसे जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉडो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या रुद्र अधावडे, ओम गोगावले, ईश्वरी गोरे, रुद्रनिल मोहिते, अर्णव गोफाणे, स्वरा चव्हाण आणि आयुष जाधव यांनी सुवर्णपदक पटकावत शाळेचे नाव उंचावले. देवाशिश तपकिरे, कार्तिक चव्हाण, अंश धामणकर, सई गोगावले, शांभवी वाघ आणि सई चाळके यांनी रौप्यपदक मिळवले. तर श्लोक देवकाते, उदय मोरे, निमिष शिंदे, आर्या कदम, मानव सागवेकर, जिग्नेश आखाडे आणि स्वस्तिका खरावते यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण आणि तायक्वॉडो प्रशिक्षक पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.