‘सुरक्षित बचपन अभियान’तून विद्यार्थ्यांना बालहक्क आणि सायबर सुरक्षिततेचे धडे!

वरवडे येथील Ideal English School मध्ये तालुका विधी सेवा समितीचा कायदेविषयक जागृती उपक्रम

कणकवली : बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, कणकवली व वकील संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले. NALSA जागृती योजना २०२५ अंतर्गत आयोजित या अभियानाच्या माध्यमातून वरवडे येथील Ideal English School मधील विद्यार्थ्यांना बालहक्क, POCSO कायदा आणि सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बुधवारी (४ नोव्हेंबर) या मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तालुका विधी सेवा समिती, कणकवलीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश श्री. शुभम लटूरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्यावरील अन्याय व शोषणाविरुद्ध संरक्षणात्मक उपायांची माहिती देणे, तसेच त्यांच्यामध्ये कायद्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

शिबिरामध्ये लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) या विषयावर अॅड. पद्मश्री मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालकांचे लैंगिक शोषण, अशा गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी, बालकांचे अधिकार तसेच अशा प्रसंगी मदत मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर यंत्रणांची माहिती त्यांनी सोप्या भाषेत दिली.

सायबर गुन्हे या विषयावर पोलीस कॉन्स्टेबल श्री. कोलते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना घ्यावयाची खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यांविरोधात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी माहिती दिली. तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी सजग आणि जबाबदार राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी Child Friendly Legal Services to Children and their Protection Schemes, बालकांचे मूलभूत अधिकार, NALSA राष्ट्रीय विधी सेवा हेल्पलाइन क्रमांक तसेच Ghar Ghar Mein Nyaay Ki Jagriti – Jagriti Unit Scheme, 2015 याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर सहाय्याच्या सुविधा आणि न्याय मिळविण्यासाठी असलेल्या विविध यंत्रणांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.

तालुका विधी सेवा समिती, कणकवली आणि वकील संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच बालकांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बालपण सुरक्षित, आनंदी आणि निर्भय असणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाची किंवा कायद्याची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला.