कणकवली कॉलेजमध्ये करिअर कट्ट्याच्या बिझनेस क्लबअंतर्गत अभिनव उपक्रमाचे उद्घाटन!
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव मिळणार!
कणकवली : विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण, कौशल्ये आणि कार्यक्षमता ओळखून त्यांना व्यवसायाची जोड दिल्यास भविष्यात निश्चितच यशस्वी उद्योजक बनता येईल. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येणारे असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त डेगवेकर साहेब यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेजच्या ‘करिअर कट्टा’ आयोजित ‘बिझनेस क्लब’ अंतर्गत ‘ऊर्जा बिझनेस’ या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ५) पोस्ट ऑफिससमोरील प्रांगणात डेगवेकर साहेब यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे होते.
विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि त्यांना व्यवसायातील प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे यांनी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा संधींचा पुरेपूर लाभ घेत स्वतःच्या क्षमता विकसित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. डॉ. बाळू राठोड आणि प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत व्यवसायातील नवनवीन तंत्रे, आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील व्यावसायिक संधी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील ऊर्जा ओळखून तिला योग्य व्यवसायाची जोड दिल्यास ‘ऊर्जा’ हा ब्रँड यशाची नवी शिखरे गाठू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. लक्ष्मण राठोड यांनी बिझनेस क्लबमधील विद्यार्थ्यांकडून विशेष मेहनत घेऊन तयारी करून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या व्यवसाय प्रकल्पाची आखणी करून तो प्रत्यक्षात साकारला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू आणि दिवाळी साहित्याचे आकर्षक स्टॉल्स उभारले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूंची मांडणी, विक्री, ग्राहकांशी संवाद आणि व्यवसाय व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
यावेळी करिअर कट्टा समन्वयक प्रा. अविनाश पोरे, प्रा. सत्यवान राणे, प्रा. सुकन्या राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अविनाश पोरे यांनी करिअर कट्ट्याच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी बिझनेस क्लब कार्यरत असल्याचे सांगितले.
उद्घाटनानंतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉल्सना भेट देत दिवाळी साहित्याची खरेदी केली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष व्यवसायातील अनुभव मिळणार असून, त्यांच्या उद्योजकीय प्रवासासाठी ‘ऊर्जा बिझनेस’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.














