चार विद्यार्थ्यांची विज्ञान गौरव परीक्षेसाठी निवड; संस्थेसह प्रशालेकडून अभिनंदन
स्वप्निल कदम -कुडाळ: आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आवळेगाव हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि विश्वामित्र चॅरिटेबल ट्रस्ट (दिगवळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांची पुढील विज्ञान गौरव परीक्षेसाठी निवड झाली आहे.
विज्ञान संबोध परीक्षेसाठी इयत्ता आठवीतील आठ, तर नववीतील नऊ असे एकूण १७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये आठवीतील रसिका संतोष कोळापटे हिने यश मिळविले. तर नववीतील चैतन्या संतोष परब, तनया संतोष कानसे आणि तन्मय प्रवीण कुपेरकर या तीन विद्यार्थ्यांची विज्ञान गौरव परीक्षेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मानसी सावंत, सचिव भिकाजी तळेकर तसेच संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक दशरथ काळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.













