कोकणच्या लेकींची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात धडक; आचरा महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची निवड!

तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर करणार पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व!

आचरा -अर्जुन बापर्डेकर

आचरा- कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आचरा शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून, महाविद्यालयाच्या दोन गुणवंत महिला क्रिकेटपटूंची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर या दोन्ही खेळाडू आता पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

 

मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज एन. रेड्डी यांनी दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्राद्वारे या निवडीची घोषणा केली आहे.

 

प. पु. सावनी विद्यापीठ (P. P. Savani University), सुरत (गुजरात) येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात आचरा महाविद्यालयाच्या तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर यांना स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाचा संघ २१ नोव्हेंबर रोजी मुंबईहून सुरतकडे रवाना होणार आहे.

 

या दोन्ही खेळाडूंना क्रिकेटमधील कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच स्पर्धेच्या तयारीसाठी विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी, मालवण यांच्या माध्यमातून संदीप पेडणेकर, सुशील शेडगे आणि ज्ञानेश केळुसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचा मान संपादन केला.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर थेट मुंबई विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे आचरा महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी, मालवण यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाचेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप मिराशी, आचरा महाविद्यालयाचे चेअरमन संजय मिराशी, खजिनदार विद्यानंद परब आणि सचिव समीर बावकर यांनी दोन्ही खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी आणि आगामी स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नितेश सारंग , सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनीही तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर यांचे अभिनंदन केले आहे.

 

कोकणच्या मातीतून मुंबई विद्यापीठाच्या संघापर्यंत मजल मारणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी आपल्या यशातून ग्रामीण भागातील इतर विद्यार्थिनींसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. आता सुरतच्या मैदानावर आपल्या खेळाची चमक दाखवण्यासाठी या दोन्ही खेळाडू सज्ज झाल्या आहेत!