पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचे पोलीस पाटलांना दक्षतेचे निर्देश; घरफोडी, चोरी व चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन
मंडणगड प्रतिनिधी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात घरफोडी, चोरी आणि चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडणगड पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मंडणगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे अनेक घरे काही दिवस बंद राहतात. अशा बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घर बंद करून बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेची जबाबदारी शेजाऱ्यांवर सोपवावी. घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी. शक्यतो दागिने व महत्त्वाच्या वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही पोलीसपाटलांना देण्यात आले आहेत. गावाच्या हद्दीत कोणतीही संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्यास तिच्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. तसेच गावातील घरफोडी व चोरीच्या घटना टाळण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक दक्षता घ्यावी. याशिवाय मंदिरांमधील दानपेट्या आणि मंदिरातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिक, पोलीसपाटील आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावागावांतील सुरक्षिततेची यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी केले आहे.













