उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची लाभणार उपस्थिती; शिवसेनेची पत्रकार परिषदेत माहिती
मंडणगड (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी मंडणगड नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेसह नमो उद्यानाचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण विकासकामांच्या भूमिपूजनाची माहिती शिवसेनेच्या वतीने गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मंडणगड पंचायत समितीच्या सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सभापती सौ. प्रणाली चिले, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, जितेंद्र दवंडे, नगरसेवक सुभाष सापटे, आदेश मर्चंडे, निलेश सापटे, योगेश जाधव, नगरसेविका सेजल गोवळे, प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, नम्रता पिंपळे, इरफान बुरोंडकर, सिद्धेश देशपांडे, निलेश गोवळे, आकाश सापटे, शैलेश शिगवण, भुपेन बोर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी १० नोव्हेंबर रोजी मंडणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य भूमिपूजन सोहळ्याची सविस्तर माहिती देण्यात आली. या ऐतिहासिक विकास सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर म्हणाले की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पक्षप्रमुख तसेच शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंडणगड शहराची गेल्या चाळीस वर्षांपासूनची पाणीसमस्या मार्गी लागण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रयत्नांमुळे मंडणगड तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न व दीर्घकाळ रखडलेल्या समस्या मार्गी लागत आहेत. या भूमिपूजन समारंभाला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार असल्याने विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या मंडणगड तालुक्याच्या इतिहासात या दिवसाची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील जनतेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले.
शिवसेना शहरप्रमुख तथा नगरपंचायतीचे विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी सांगितले की, साडेचार वर्षांपूर्वी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंडणगड शहरासाठी तब्बल ४२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी नळपाणी योजना मंजूर करून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कृष्णानगर येथे एक कोटी रुपये खर्चाचे नमो उद्यान विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सेजल गोवळे आणि नगरसेवक सुभाष सापटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री तसेच केंद्र व राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले.
मंडणगड शहराच्या पाणीप्रश्नावर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्याच्या दृष्टीने ४२ कोटींची नळपाणी योजना आणि नागरिकांसाठी विकसित होणारे नमो उद्यान हे दोन्ही प्रकल्प शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.













