हिंदळे शाळेत ‘दिवाळी विशेष’ हस्तकला प्रदर्शन व विक्री संपन्न!

 ▪️विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ!

मसुरे | झुंजार पेडणेकर :                  पूर्व प्राथमिक शाळा, हिंदळे भंडारवाडी व हिंदळे ग्रामोन्नती मंडळ, वाचनालय हिंदळे यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी प्रामुख्याने दिवाळी साठी कंदील, पणत्या, उटणे व रंगीत रांगोळी बनवण्याचा उपक्रम प्रशालेत घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाशकंदील, आकर्षक पणत्या, सुगंधी उटणे व रांगोळी बनवण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या दिवाळी उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढावे, आपल्या भारतीय सण-समारंभ व परंपरांचे ज्ञान आत्मसात व्हावे आणि आनंद मिळावा असे अनेक हेतू होते. याद्वारे विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला व कलागुणांना उत्तम वाव मिळाला. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचा मोलाचा वाटा होता.

या प्रदर्शन व उपक्रमास हिंदळे गावचे सरपंच श्री. मकरंद शिंदे यांनी आवर्जून भेट दिली आणि मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरपंच श्री. मकरंद शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच आपल्या पारंपरिक संस्कृतीची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अशाप्रकारचे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत. आपल्या मुलांनी स्वतः हाताने बनवलेली उत्पादने पाहून आणि त्यांचा हा उत्साह पाहून अतिशय आनंद झाला आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच त्यांनी स्वतः विशेष खरेदी करून मुलांना स्व कमाईचा आनंद मिळवून दिला. यावेळी सिद्धकला भजनी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. दत्तात्रय परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सेजल राणे, सौ. कविता शिंदे, श्रीमती हिंदळेकर, सौ. राणे, सौ. मिताली हिर्लेकर, श्री. सुरेश हिंदळेकर आणि श्री. प्रकाश बोरकर उपस्थित होते.

या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज धुरत, श्री. योगेश बांदल, श्री. सचिन पुजारे, सौ. शितल संदीप मयेकर मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या या उत्पादनातून आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. या सुंदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.