प्रौढ महिलेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप व 1 महिना सश्रम कारावास

गुहागर | प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील प्रौढ महिलेवर लैंगिक अत्याचार व जीवे ठार मारण्याचा गुन्हा सिध्द झाल्याने या खटल्यामध्ये चिपळूण सत्र न्यायालयाने आरोपी टुनटुनकुमार रामप्रवेश महतो याला जन्मठेप, १ महिना सश्रम कारावास व रु. १००० दंडाची शिक्षा फर्मावली आहे.

सदरची घटना ही सन २०१९ मध्ये घडली. गुहागर तालुक्यातील प्रौढ महिला गावाबाहेरील शेतामध्ये काम करीत होती. पावसाचे दिवसामध्ये त्यांच्या गावाबाहेरील शेतात दुपारचे वेळेत काम करीत असताना आरोपीने आजुबाजुला कोणी नाही हे पाहून जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रौढ महिला ही पायवाटेने गावाकडे जायला निघाली तेव्हा आरोपीने पाठीमागून धावत येवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तिच्या दोन्ही हाताला दोरी बांधून तिचा गळा कपडयाने बांधून आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पिडीता निपचित झाल्यावर तिच्यावर जंगली झाडाझुडपांच्या फांदया टाकून आरोपी निघुन गेला.

सदरचा घटना पिडीतीने तिचे नातेवाईक, पोलीस पाटील व गावातील लोकांना सांगितले. गावक-यांनी पिडीत महिलेने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचा शोध घेतला असता गावबाहेरील गॅस कंपनीचे पाईपलाईनचे कामाजवळ गावक-यांना आरोपी मिळून आला. त्याला पकडून गावक-यांनी पिडीतेला दाखविले असता तिने परप्रांतीय आरोपीला ओळखले व त्यानंतर पिडीतेने गुहागर पोलीस ठाणे येथे आरोपी विरुध्द तक्रार दाखल केली. तपासिक अधिकारी संदीप पाटील यांनी आरोपी विरुध्द तपास करुन भा.द.वि.का.क. ३७६,३०७,३४१,३४२ अन्वये दोषारोप दाखल केला.

जेष्ठ सरकारी वकील श्रीम. अनुपमा ठाकूर यांनी सरकारपक्षातर्फे सदरचा खटला चालवताना ९ साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला. परिणामी चिपळूण सत्र न्यायाधीश श्री. म्हालटकर साहेब यांनी आरोपीला भा.द. वि.का.क. ३७६ अन्वये जन्मठेप व रु. १०००/- दंड, दंड न भरल्यास १ महिन्याचा सश्रम कारावास, कलम ३०७ अन्वये जन्मठेव व दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास, कलम ३४१ अन्वये १ महिना साधा कारावास, कलम ३४२ अन्वये १ महिना साधा कारावासाची शिक्षी फर्मावली आहे.

पिडीत महिलेने दाखविलेले धैर्य, तपास यंत्रणेने केलेला तपास आणि जेष्ठ सरकारी वकील यांचे कायदेशीर कौशल्य यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळाली आहे.

खटल्यामध्ये सरकारपक्षातर्फे जेष्ठ सरकारी वकील श्रीम.अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले असून त्यांना गुहागर कोर्ट पैरवी श्री. ए.एस. शिंदे यांनी सहाय्य केले .