कै. मेजर अंकुशराव शिंदे यांच्या स्मरणार्थ मोरवणे शाळेत भव्य रंगमंचाची उभारणी!

सैनिकी कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी
 तृतीय स्मृतिदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंचाचे उद्घाटन

चिपळूण (प्रतिनिधी) : देशसेवेचा वारसा जपतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजासाठी योगदान देण्याची परंपरा मोरवणे गावातील सैनिकी कुटुंबाने जपली आहे. मोरवणे गावचे सुपुत्र, दानशूर व्यक्तिमत्त्व कै. मेजर अंकुशराव राजारामराव शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी आरती शिंदे, बंधू अशोकराव, शिवाजीराव, तानाजीराव आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने मोरवणे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या प्रांगणात भव्य रंगमंचाची उभारणी करण्यात आली आहे. या रंगमंचाचे उद्घाटन कै. मेजर अंकुशराव शिंदे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त २५ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या उद्घाटन सोहळ्याला श्रीरामवरदायनी देवस्थान ट्रस्ट, दादरचे अध्यक्ष तथा चिपळूण पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ मार्गदर्शक बळीराम शिंदे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत पालांडे, दसपटी विभाग मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप शिंदे, चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी इरनक, मोरवणे ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा केंद्रप्रमुख भगवान मोरे, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या दीप्ती महाडीक, शिवाजी पालांडे, मोहन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी प्रताप शिंदे, बळीराम शिंदे, प्रदीप शिंदे, यशवंत पालांडे, शिवाजी पालांडे, बाबा शिंदे, जयवंत अदावडे आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रताप शिंदे आणि बळीराम शिंदे यांनी कै. मेजर अंकुश शिंदे यांच्या दानशूर स्वभावाचा आणि सामाजिक योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी गावातील धार्मिक व शैक्षणिक संस्थांना वेळोवेळी भरघोस आर्थिक मदत करून विविध विकासकामांना मोठा हातभार लावला होता. केवळ मोरवणे गावापुरतेच नव्हे, तर संपूर्ण दसपटी विभागाच्या सामाजिक क्षेत्रात या कुटुंबाचे आणि घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम कुटुंबीयांनी रंगमंचाच्या उभारणीतून केले आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
या प्रसंगी मोरवणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मयाराम पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष अस्मिता ढगळे, मनोज जंगम, शिक्षकवृंद आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने शिंदे कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांना सरस्वती देवीची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मानित करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या या रंगमंचाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, शैक्षणिक उपक्रमांसाठी तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी होणार आहे. त्यामुळे शाळेच्या उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होणार आहे. एका दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जतन करताना त्यातून पुढील पिढीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला हातभार लावणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. कै. मेजर अंकुश शिंदे यांच्या स्मृतींना सामाजिक कार्याच्या माध्यमातून उजाळा देणाऱ्या शिंदे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्मरण केवळ शब्दांतून नव्हे, तर समाजोपयोगी कार्यातूनही जपता येते, याचा आदर्श या कुटुंबाने निर्माण केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष शिंदे ऊर्फ बावा गुरुजी यांनी केले, तर तानाजी शिंदे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.