ग्रामस्थांची आग्रही मागणी; ग्रामसभेत एकमुखी ठराव
शिरगाव (प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील शिरगाव-राकसघाटी येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाला विनामोबदला जमीन व इमारत दान करणारे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांचे नाव या विद्यालयाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत ३१ ऑक्टोबर रोजी शिरगाव येथील हनुमान मंदिरात ग्रामस्थांची सभा पार पडली. या सभेत विद्यालयाच्या नामांतराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने नामकरण करताना गावाच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि जनभावनांचा आदर करावा. कै. आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याऐवजी कै. पुंडलिक कर्ले यांचे नाव देण्यात यावे, अशी एकमुखी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. या सभेला संदीप साटम मिलिंद साटम विजयकुमार कदम संभाजी साटम एकनाथ तावडे अमित साटम संजय रुपये प्रथमेश तावडे मंगेश लोके देवदत्त कदम सुधीर साटम भाई तावडे शरद फाटक विनायक साटम बंडू माने आदी दशकोशोतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिरगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर १९८४ मध्ये येथे शासकीय तांत्रिक विद्यालय सुरू झाले. या विद्यालयाच्या उभारणीसाठी कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांनी शासनाला विनामूल्य जमीन व इमारत उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या योगदानामुळेच विद्यालयाच्या स्थापनेचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे नामकरण करताना त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा सन्मान व्हावा, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, या मागणीसाठी ४ नोव्हेंबर रोजी शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत शासकीय तांत्रिक विद्यालयास कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांचे नाव देण्यात यावे, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेला सुमारे २३० ग्रामस्थ उपस्थित होते. मंजूर झालेला ठराव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
चौकट :शासनाने जनभावनांचा आदर राखून संस्था उभारणीत योगदान दिलेल्या गावातील महनीय व्यक्तीचे नाव संस्थेला देण्यास गोगटे कुटुंबीयांची मान्यता व संमती आहे, अशी प्रतिक्रिया कै. आप्पासाहेब गोगटे यांचे चिरंजीव प्रकाश गोगटे यांनी दिली आहे.













