दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून मोती तलावावर रंगणार भव्य दीपोत्सव
सावंतवाडी:अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर, श्रीमंत शिवरामराजे पुतळ्यानजीक हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न होणार असून, हजारो दिव्यांच्या दिव्य प्रकाशाने मोती तलावाचा परिसर उजळून निघणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणून नागरिकांसाठी विशेष सेल्फी पॉईंट्स देखील उभारण्यात येणार आहेत.
या दीपोत्सवाचे औचित्य साधून अभिनव फाउंडेशनतर्फे भव्य रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी दीपोत्सव सोहळ्याची आकर्षक रील तयार करून ती अभिनव फाउंडेशनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचे विस्तृत नियम व अटी फाउंडेशनच्या ‘AbhinavfoundationSindhudurga’ या फेसबुक पेजवर तसेच ‘abhi.navfoundation’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या रील स्पर्धेसाठी वीर सावरकर पतसंस्था, सावंतवाडी यांनी आकर्षक बक्षिसे प्रायोजित केली आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ३,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास २,००१ रुपये आणि तृतीय क्रमांकास १,००१ रुपये यासह विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले जाणार आहे.
तरी या अनोख्या रील स्पर्धेत इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच सावंतवाडीतील सर्व नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून हजारो दिव्यांनी उजळणारा ऐतिहासिक मोती तलाव ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा आनंद घ्यावा, असे अगत्याचे आवाहन अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.













