अखेर खेर्डीमध्ये फायर स्टेशन होणार!

 उमेश खताते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
 उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हालचालींना वेग

चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी गावासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खेर्डी येथे स्वतंत्र फायर स्टेशन सुरू व्हावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहन उपलब्ध व्हावे, यासाठी युवासेनेचे रायगड रत्नागिरी लोकसभा सरचिटणीस उमेश खताते यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली असून, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने खेर्डी येथे फायर स्टेशन सुरू करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
खेर्डी हे सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव असून, येथे एमआयडीसी क्षेत्रदेखील आहे. गावात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. अशावेळी चिपळूण किंवा इतर ठिकाणांहून अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत बराच वेळ लागतो. त्यामुळे आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण होते. अनेकदा वेळेत अग्निशमन वाहन उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन उमेश खताते यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन खेर्डीमध्ये फायर स्टेशनची आवश्यकता पटवून दिली होती. खेर्डीची लोकसंख्या, एमआयडीसी क्षेत्राचा विस्तार आणि परिसरातील औद्योगिक व नागरी सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता येथे अग्निशमन केंद्र असणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली होती. गणपतीमध्ये देखील पुन्हा उमेश खताते यांनी उदय सामंत यांची भेट घेत पुन्हा पाठपुराव केला होता अखेर या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून खेर्डी येथे फायर स्टेशन सुरू करण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच खेर्डी परिसरासाठी अग्निशमन वाहन उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पंचायत समिती निवडणुकीत उमेश खताते यांनी जनतेला खेर्डीगावाला वचन दिले होते आणि ना. उदय सामंत देखील उमेश खताते याला शब्द दिला होता, ते आज पूर्ण केले. खेर्डीच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळत असलेले हे यश नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. फायर स्टेशन सुरू झाल्यास खेर्डी गावासह एमआयडीसी परिसरातील उद्योजक, कामगार आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मोठा आधार मिळणार आहे. खेर्डीच्या विकासासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने मांडणाऱ्या उमेश खताते यांच्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.