सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी

मंगळूर येथे १० किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक!

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे जोशीवाडी येथील युवा धावपटू स्वराज संदीप जोशी याने आपल्या जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६-२७ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्वराज याने १० किलोमीटरची क्रॉस कंट्री शर्यत अत्यंत कमी वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या देदीप्यमान यशामुळे सावर्डे पंचक्रोशीसह चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या स्वराजने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. धावण्याच्या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता, वेग, सहनशक्ती, मानसिक एकाग्रता आणि सातत्य यांचा सुरेख संगम त्याच्या कामगिरीतून दिसून आला. मंगळूर येथील स्पर्धेत १० किलोमीटरचे अंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करत सुवर्णपदकावर नाव कोरणे ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी आहे. स्वराज जोशी हा डेरवण येथील SVJCT स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक श्री. अविनाश पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज नियमित सराव करतो. स्पर्धेची तयारी, धावण्याचा सराव, शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर स्वराजने हे यश मिळवले आहे. खेळाडूच्या गुणवत्तेला योग्य दिशा देत त्याच्याकडून सातत्यपूर्ण सराव करून घेण्यात प्रशिक्षक अविनाश पवार सर यांचे मोलाचे योगदान आहे. स्वराजच्या या यशामागे त्याने घेतलेली मेहनत आणि त्याला मिळालेले प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. एका खेळाडूच्या यशामागे त्याची मेहनत जितकी महत्त्वाची असते, तितकेच त्याला घडविणाऱ्या प्रशिक्षकांचे योगदानही महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वराजच्या सुवर्णपदकाबरोबरच अविनाश पवार सरांचेही सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन होत आहे.
सावर्डेच्या मातीतून तयार झालेला हा युवा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकल्याने परिसरातील क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वराजच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर होतकरू खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. स्वराज संदीप जोशी याच्या या सुवर्णमय कामगिरीबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच त्याला घडविणारे प्रशिक्षक श्री. अविनाश पवार सर यांचेही विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. स्वराजने यापुढेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन करून सावर्डे, चिपळूण आणि कोकणचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा आ. शेखर निकम, जि प सदस्य पूजा निकम पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, व्यापारी संघटना अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, संजय चव्हाण, देवराज गरगटे, अशोक काजोरोलकर, प्रितेश मोहिते, मंदार शेंबेकर, शांताराम बागवे तसेच सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.